M.S Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन, ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
M.S Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी चेन्नई येथे निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथन हे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक होते. (M.S Swaminathan)
देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.
एम. एस. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिलं. १९७२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते.
पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० ते ८२ या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. १९८२ ते ८८ या ७ वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केले.