आलिशान व्हिला, एका हॉलमध्ये 40 लोक, नंतर जे कांड झालं, पोलीसही चक्रावले, मुळशीत खळबळ…


पुणे : परिसरात एका आलिशान व्हिलामध्ये अजब प्रकार सुरू होता. मुळशी तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मुगावडे या व्हिलामध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पौड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.

एकाच हॉलमध्ये बसून जुगार खेळणाऱ्या तब्बल ४० जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले असून, या कारवाईने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुगावडे गावच्या हद्दीत असलेल्या ‘निवांत व्हिला’ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पौड पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलिसांनी या व्हिलावर छापा टाकला. तेव्हा तिथले दृश्य पाहून पोलीसही थक्क झाले. मुळशी, हवेली आणि भोर या तीन वेगवेगळ्या तालुक्यांतील ४० लोक तिथे जमले होते आणि पत्त्यांचा जुगार खेळण्यात मग्न होते.

या धाडसी कारवाईत पोलिसांनी एकूण ८ लाख २४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १ लाख ६४० रुपये रोख रक्कम. ७ लाख २० हजार १६० रुपये किमतीचे एकूण ३० मोबाईल संच आणि जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे पत्त्यांचे १२ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेचा हा एक भाग मानला जात आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुळशीतील ग्रामीण भागात अशा प्रकारे बाहेरच्या तालुक्यातील लोक येऊन जुगार खेळत असल्याने स्थानिक परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पौड पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!