प्रियकर मृत्यूनंतरही जिंकला’; कुटुंबाकडून तरुणाची हत्या, तरुणीने बॉडीसोबतच केलं लग्न;, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

नांदेड: नांदेड शहरातील जुना गंज भागात प्रेम संबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सक्षम ताटे या तरुणाची मुलीच्या वडील आणि भावाकडून हत्या करण्यात आली आहे.या हत्येनंतर मुलीने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या, अशी मागणीच केली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकराच्या पार्थिवाशी त्या तरुणीने लग्न केल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आँचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. ‘तू दुसरा कुणीही आण पण हा नकोच! असं वारंवार सांगितलं गेलं. त्याला मारून टाकू अशीही धमकी देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं. आँचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली. या हत्येनंतर शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षम सोबतच लग्न करणार असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आंचलने सक्षमच्या पार्थिवदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं. “आमच्या प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारलं. पण, ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. माझ्यावर कुणाचीही जोर जबरदस्ती नाही. मी माझ्या वडिलांना आणि भावाला जिंकू देणार नाही. मी सक्षमची आहे आणि शेवटपर्यंत सक्षमचीच बनून राहणार’ असं म्हणत आँचलने टाहो फोडला. तसंच, प्रियकराच्या मृत्यूनंतरही मी त्याचीच राहणार असा, निर्धार तरुणीने केला.
दरम्यान, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आँचलने केली. दरम्यान, या खून प्रकरणी इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आँचलच्या वडील आणि भावासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
