जवळचा सहकारी मित्र गमावला ; अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांसह अख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील आपला एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत सर्व प्रकारचे नियोजित सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.अजित पवार यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून येणारी नाही. मी माझा सहकारी मित्र गमावला अशी भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती एक्स वरून दिली आहे.
अजित पवार यांच्या जाण्याच्या या वेदनेतून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. मी माझा एक कर्तव्यदक्ष सहकारी आणि मित्र गमावला आहे. अशा परिस्थितीत कोणताही सोहळा करणे मला उचित वाटत नाही. आपण सर्वांनी या परिस्थितीचे गांभीर्य राखून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी आणि उत्साह टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते, पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शुभेच्छा देण्यासाठी कुणीही पुष्पगुच्छ किंवा महागड्या भेटी आणू नयेत. रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत.
तसेच केक कापणे किंवा इतर कोणतेही भव्य कार्यक्रम किंवा सार्वजनिक सोहळे आयोजित करू नयेत. वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी सामाजिक कार्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरावा, असे संकेतही एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत.