प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मुल्य दिले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे : प्रभु श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररुपी मानतो. त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु, पक्षी व वानर यांची मदत घेऊन विश्वातील मोठी आसुरी शक्ती असणाऱ्या रावणाचा निपात केला. सर्वसामान्य माणूस सत्त्यासाठी लढला तर त्याचा विजय निश्चित आहे हे प्रभु श्रीरामांनी करुन दाखविले आहे. प्रभू श्रीरामांनी खऱ्या अर्थाने माणसांना जीवन जगण्याचे मुल्य दिले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पुजन केले. या प्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासणे, सद्‌गुरु शंकर महाराज मठाचे अध्यक्ष डॉ. मीहिर कुलकर्णी, चित्रा देशपांडे आदी उपस्थित होते.

युगपुरुषांमध्ये प्रभू श्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्रीरामांचे आयुष्य हे वेगवेगळ्या स्वरुपाचे राहिले आहे. त्यांच्यामध्ये बुद्धीमत्ता, स्थिरता, संस्कार, उत्कृष्ट शासक असे अनेक गुण होते. त्यांनी घालून दिलेल्या मुल्यांवर आपण जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

गीत रामायण हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. रामायणातील रामचरित्रातील विविध प्रसंगांवर ग.दि. माडगुळकर यांनी रचना केल्या आहेत व त्याला तितक्याच सुमधूर चाली सुधीर फडके बाबुजींनी दिल्या आहेत. या गीतरामायणामध्ये आनंद, दुख, अश्रु व हास्य यासह विविध भावना पहायला मिळतात. रामनवमीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गीतरामयणाचा कार्यक्रम होत असल्याचा आनंदही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीहिर कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रिया गोडबोले यांनी केले. या गीतरामायण कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!