ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान! पुण्यातील महिलेला ऑनलाइन पतीचा शोध पडला तब्बल ८ लाखाला…
पुणे : मॅट्रिमाेनियल साइटवरून’ संपर्कात आलेल्या ताेतया विवाहेच्छुक तरुणाने एका महिलेला ८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. आला. याप्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने सांगवी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेने एका मॅट्रिमाेनियल साइटवर स्वत: ची नोंदणी करून सुमारे दोन महिन्यांपूर्वी यूकेमध्ये स्थायिक झालेल्या पुरुषाची प्रोफाइल पाहिली होती. महिलेने पुरुषाशी बराच काळ संवाद साधल्यानंतर त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय फिर्यादी महिलेने घेतला आणि त्यानंतर एकमेकांच्या कुटुंबांची वैयक्तिक माहितीची आणि तपशीलांची देवाणघेवाण केली.
तसेच १ मे रोजी फिर्यादीला आरोपीने सांगितले की, मी सिंगापूरला मिटिंगसाठी जात आहे आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याला थांबणार आहाेत. त्याने तिला सांगितले की, त्याने त्याचे सामान तिच्या पत्त्यावर पाठवले आहे, जेणेकरून ते अगोदर पोहोचावे. त्याने तिला बॅगचा फोटो आणि कुरिअर कंपनीची पावतीही पाठवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
त्यांनतर महिलेला सीमा शुल्क आकारण्याची मागणी करणारा कॉल आला. महिलेने ५८ हजार रुपये भरल्यानंतर बॅगमधील सोने, विदेशी चलन आणि उच्च श्रेणीतील मोबाइल फोनसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या लहान बहिणीसाठी मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम पाठवली आहे, म्हणून अतिरिक्त कस्टम ड्युटी, भारतीय कर, चलन रूपांतरण शुल्कासाठी आणखी पैसे लागणार असे सांगून पुरुषाने महिलेकडून ७ लाख ९८ हजार रुपये उकळले.
दरम्यान, एवढे पैसे भरूनसुद्धा अधिक पैशांची मागणी केल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनतर तत्काळ सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेत महिलेने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता कलमांतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारी, विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.