लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत अभूतपूर्व यश…

लोणी काळभोर : येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत शाळेच्या नावाला नवी उंची दिली आहे. राज्यस्तरीय फेरीतून निवड झालेल्या सर्व ३५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मेरिटमध्ये स्थान मिळवत १०० टक्के यश मिळवले असून एक प्रकारे विक्रमच प्रस्थापित केला आहे. या यशामुळे शाळेचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात शाळेतील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरले आणि विशेष म्हणजे या सर्वच विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये झळकून दुहेरी यशाची नोंद केली. स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या १० विद्यार्थ्यांना बक्षीस, तर ११ ते २० विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार दिला जातो. या दोन्ही गटांमध्ये स्थान मिळवत शाळेने उत्कृष्टतेचा ठसा उमटवला आहे.
इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रतीक प्रशांत वर्तले याने राज्यात ६ वा क्रमांक पटकावला, तर प्रतीक मेघरज यादव याला ‘उत्कृष्टता पुरस्कार’ मिळाला आहे. उर्वरित ३३ विद्यार्थ्यांनाही मेडल व प्रमाणपत्र जून महिन्यात प्रदान करण्यात येणार आहे.

या यशामागे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी, उपप्राचार्य शिंदे, परीक्षा प्रमुख जाधवर, सहाय्यक कदम तसेच गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांवर, पालकांवर आणि शिक्षकांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोणी काळभोरच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.