लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई, ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,१३ जणांवर कारवाई

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीसांनी अवैध जुगार अड्डयावर कारवाई करुन जुगाराचे साहित्य, जुगाराचे खेळातील रोख रक्कम, अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्ड्यावर येणेसाठी वापरलेल्या ५ दुचाकी वाहनांसह ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी सचिन सोपान सकट (वय २०), विशाल हंसराज गुप्ता (वय २५) मंगेश पुंडलीक शिंदे (वय २९), गणेश लक्ष्मण सानप (वय ३८), योगेश कैलास चौधरी (वय ३७), अर्जुन पन्नालाल येरवल (वय २८), अहमद शब्बीर मोगल वय (४०), विवेक मधुकर काळभोर (वय ४८), शब्बीर हाजीमियाँ शेख (वय २९) अल्फाज अलीम शेख (वय २१) सयाजी वामन पवार (वय २९ सर्व राहणार लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांचेविरुध्द तसेच अवैध धंदा चालक कानीफनाथ जगदाळे (रा. माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) व ज्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता त्या गुरुकृपा निवास या घराचे घरमालक अरुण सोपान काळे यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन अवैध धंदयांवर प्रभावी कारवाईची मोहिम राबविली आहे.

सदर मोहिमेच्या अनुषंगाने सोमवार (८ डिसेंबर) रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारांस लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील गुरुकृपा निवास या इमारतीच्या छतावर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.

माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जुगार खेळत असलेले ११ जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तेथे असलेले जुगाराचे साहित्य, खेळातील रोख रक्कम, त्यांचे अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्ड्यावर येणेसाठी त्यांनी वापरलेली ५ दुचाकी वाहनांसह ताब्यात घेतले. सदर कारवाई दरम्यान रोख रक्कम २५ हजार ६६० रुपये व इतर मुद्देमाल असा एकुण ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारलेपासुन आजपर्यंत अवैध दारु धंद्यांवर १०३ कारवाया, अवैध गांजा विक्रीवर १४ कारवाया, अवैध जुगारांवर ३६ कारवाया, अवैध गुटखा विक्री, वाहतुक व साठा धारकावर १ अशा एकुण १५४ प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्याचप्रमाणे अवैध मटका चालवीणारे २ इसमांविरुध्द एम.पी.डी.ए. कारवाई केली असुन १ अवैध जुगार चालकास तडीपार केले आहे.
तसेच अवैध दारु विक्रेत्या १ महिलेस देखील तडीपार करण्यात आले आहे. यापुढे देखील प्रभावी कारवाया करुन अवैध धंद्यांचे लोणी काळभोर हद्दीतुन समुळ उच्चाटन करण्याचा त्याचा मानस असल्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
