प्रदीर्घ काळ प्रलंबित खराडी शहराचे नगर भूमापन अंतिम टप्प्यात, विकासाला मिळणार गती…
पुणे : राज्यातील सुमारे 40 हजार गावामधील नगर भूमापनासाठी केंद्र शासनाने ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून स्वामित्व योजना सन 2019 पासून राबविली जात आहे. वास्तविक पहाता स्वामित्व योजना हि महाराष्ट्राने देशाला दिलेल्या अनेक योजनांपैकी ही एक आहे. गावठाण जमाबंदी प्रकल्प या नावाने सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावात सन 2018 मध्ये भूमि अभिलेख विभागाच्या पुढाकाराने सुरु करून यशस्वी करण्यात आला.
हाच प्रकल्प केंद्र शासनाने स्वामित्व या नावाने पूर्ण देशात लागू करण्यात आला. गावठाण या रहिवास भागात राहणा-या नागरिकांना मालकी हक्काचा पुरावा देणारी हि महत्वाकान्क्षी योजना आहे. ड्रोन सारख्या आधुनिक साधनाचा वापर करून नगर भूमापनाचे काम केले जात आहे. आज अखेर राज्यातील पूर्ण 40 हजार गावामध्ये ड्रोनद्वारे सर्व्हे काम पूर्ण झाले आहे. ड्रोन सर्व्हेमधुन तयार इमेजवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन नकाशा, क्षेत्र, मिळकतीचा सत्ताप्रकार आणि मिळकतीचा धारक निश्चित केला जात आहे.
यासाठी खाजगी संस्थांच्या सेवा प्राप्त करून घेतल्या जात आहेत. चौकशी अधिकारी यांनी तयार केलेले सदरचे अभिलेख गाव चावडीवर आणि ग्राम सचिवालच्या प्रसिद्धी फलकावर प्रसिद्ध करून 10 दिवसाच्या मुदतीत या अभिलेखाच्या अनुषंगाने सूचना / हरकती online प्राप्त करून घेतल्या जातात. प्राप्त हरकती/सूचना विचारात घेऊन सुनावणीची संधी देऊन नकाशा, क्षेत्र, मिळकतीचा सत्ताप्रकार आणि मिळकतीचा धारक अंतिम केला जातो.
अशाप्रकारे चौकशी अधिकारी गावातील प्रत्येक मिळकतीचा अभिलेख अंतिम करतात. यावरून प्रत्येक मिळकतीची सनद मिळकत धारकास मालकी हक्काचा पुरावा म्हणून दिला जातो. राज्यातील सुमारे 16 हजार गावात सनद वाटपाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित गावांमधील कार्यवाही डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक असल्याने शासनाच्या सर्व विभागांना उपयुक्त आहेत. खराडी शहराचे नगर भूमापन पुणे महानगर पालिकेच्या विस्तारीत भागात समाविष्ट झालेल्या खराडी शहराच्या नगर भूमापनाचा सन 2007 साली निर्णय झाला पण काही तांत्रिक कारणास्तव यामध्ये सातत्याने अडचणी आल्या.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील समाविष्ट 23 गावापैकी सर्वप्रथम मौजे खराडी गावाची निवड करुन स्वामित्व योजनेच्या धर्तीवर नगर भूमापनाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी, पुणे दिनांक 03.07.2024 रोजीच्या पत्रान्वये मौजे खराडी येथील नगर भूमापन करणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 नुसार खराडी गावाची बाह्य सीमा निश्चित करण्यात आली.
सर्वप्रथम गावाची हद्द अभिलेखाप्रमाणे निश्चित करुन Ground Control Points स्थापन केले. प्रत्यक्ष सविस्तर मोजणीचे काम कार्यालयीन कर्मचारी तसेच खाजगी संस्थेच्या सेवा प्राप्त करून घेऊन (मे. मोनार्च सव्र्व्हेअर प्रा.लि.) सन 2023 मध्ये पूर्ण करणेत आले आहे. सदर मोजणीचे नकाशे पुणे महानगर पालिकेने प्रमाणित केले असून चौकशीची कार्यवाही दिनांक 06.02.2025 ते 07.02.2025 रोजी करण्यात येणार आहे. चौकशी कामी आवश्यक पूर्वतयारी खराडी शहरात एकूण अंदाजे 13300 इतक्या मिळकती असून या मिळकतीच्या सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
सविस्तर चौकशी करण्यासाठी विभागाने City Survey Enquiry Software (CSES) हि आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीचा वापर करून खराडी गावातील प्रत्येक मिळकतीचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन नकाशा, त्याचे क्षेत्र आणि धारक अंतिम केले जाणार आहे. चौकशी कामी महानगर पालिकेकडून मालमत्ता कर नोंदवहीची माहिती (PTR) डिजिटल स्वरुपात प्राप्त करून घेण्यात आली आहे. CSES आज्ञावलीत अपलोड करुन घेतला.