पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान…
पुणे : लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या पुरस्काराची रक्कम नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे प्रकल्पाला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा असल्याचे अभिमानाने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुरस्कार घेताना मी उत्साही आणि भावुक आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे.
लोकमान्य टिळक स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळक आहेत, त्याचबरोबर अण्णा भाऊ यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे. मी दोघांनाही श्रद्धापूर्वक नमस्कार करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर होते.