Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभेला पुरंदर विमानतळाचा मुद्दाच प्रचारात नाही! विमानतळाच्या भवितव्यावर नेतेमंडळींची वाचा बंद..!!

जयदिप जाधव

उरुळीकांचन : केंद्र व राज्य सरकारच्या ध्येयधोरणाचा सर्वाधिक महत्वाचा भाग असलेल्या व पश्चिम महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा प्रोजेक्ट असलेल्या प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात न उच्चारला जात असल्याने या प्रोजेक्टचे भविष्य काय म्हणून आता
चर्चा सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील विकासकामांसह वैयक्तिक आरोपांची पोलखोल सुरू झाली आहे. रोजगार उत्पत्तीसाठी एमआयडीसी प्रोजेक्ट केले नाही म्हणून एकमेकांवर तोंडसुख घेण्यात येत आहे. ‘आमच्यामुळे आमके झाले तमके झाले’ म्हणून शेखी मिरवली जात आहे. परंतु पुणे जिल्ह्यासाठी अर्थिक उत्कर्षाचा मानबिंदू ठरु पाहणाऱ्या पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्र सरकारच्या हवाई मंत्रालयाने मंजुरी देऊन तत्कालीन राज्य सरकारने २०१६ रोजीच मान्यता दिलेला पुरंदर विमानतळ अंतिम पूर्णत्वास जात नसल्याने या प्रकल्पावरुन जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहे.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाया लोकसभा निवडणूक पूर्वी भरला जाईल अशी अपेक्षा असताना अद्याप या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी जागेचा घोळात घोळवत ठेवला आहे. या विमानतळाचा विकासाची रुपरेषा काय आहे? हा प्रकल्प कधी साकारला जाईल?या प्रकल्पाने रोजगार निर्मिती कशी होईल? हा प्रकल्प या जिल्ह्याची कायापालट कशी करेल ही उत्तरे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर लोकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीचा प्रचार एमआयडीसी तसेच पाणीप्रश्नापलिकडे जात नसल्याने या प्रश्नावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीला २०१६ रोजी मंजुरी मिळाल्यापासून जागेवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. युती सरकारने पुरंदर विमानतळाला पुरंदर तालुक्यातील जुन्या जागेवर मंजुरी देऊन अंतिम टप्प्यात आणले आहे.तर महाविकास आघाडी सरकारने हे विमानतळ बारामती व पुरंदर सिमेवर व्हावे असे प्रयत्न केले होते. मात्र या जागेला केंद्रीय हवाई मंत्रालयाने मंजुरी नाकारली आहे.
परंतु महायुती सरकारने जुन्याच जागेवर हे विमानतळ उभे करणार म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. मात्र प्रचाराचा कलावधी अंतिम टप्प्यात आला असताना विमानतळाचा मुद्दामच चर्चेत आणत नसल्याने या विमानतळाचे काय होणार म्हणून अनेकांना प्रश्न पडला आहे.
