Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; पुणे, शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान, नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन…
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं असून तसेच आज (ता.१३) पुणे लोकसभा मतदारसंघासह शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी मतदान होत आहे.
या हाय व्होल्टेज लढतीचा फैसला आज मतदानयंत्रात बंद होईल. यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
पुणे लोकसभेअंतर्गत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ, अशा सहा ठिकाणांहून रविवारी सकाळी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदान कर्मचार्यांना या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मार्गदर्शन केले.
साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील साहित्य वितरण स्व. राजाराम भिकू पठारे स्टेडियम (खराडी) मध्ये करण्यात आले. ४५३कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट आणि एक हजार ३५९ बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. Lok Sabha Election 2024
शिवाजीनगर मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालयात साहित्य वितरण करण्यात आले. साहित्य वाटपासाठी नेमणूक केलेल्या कर्मचार्यांनी 28 टेबलद्वारे नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचार्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आलेली 840 बॅलेट युनिट व २८० कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण केले.
दरम्यान, कोथरूड मतदारसंघासाठी पौड रोडमधील विश्वशांती गुरुकुल विद्यालय, एमआयटी संस्था येथे १ हजार १९१ बॅलेट युनिट, ३९७ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट वितरित करण्यात आले.
पर्वती मतदारसंघासाठी शेठ दगडूराम कटारिया महाविद्यालय, महर्षिनगरमधून पर्वती मतदारसंघात १ हजार ३२ बॅलेट युनिट, 344 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले.
पुणे कॅन्टोन्मेंटसाठी अल्पबचत भवनमधून २२७ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट आणि ८२२ बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. कसबा पेठ मतदारसंघासाठी गणेश कला क्रीडा मंचमधून ८१० बॅलेट युनिट,२७० कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहेव.