Lok Sabha Election 2024 : पुण्यात भाजपनं उमेदवार जाहीर करून पहिला डाव टाकला, आता काँग्रेसची बारी, ‘ही’ नावे चर्चेत…

Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

भाजपने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीसाठी तिकीट दिले आहे.
पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. मुरलीधर मोहोळांना उमेदवारी देऊन भाजपने पहिला डाव टाकला आहे. मात्र आता कॉंग्रेसकडून कोणता उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या विरोधात उभा ठाकणार आहे, याची आता प्रतिक्षा आहे.

भाजपने पहिले आपला उमेदवार पुणेकरांसमोर आणला. पुणेकरांच्या ओळखीचा उमेदवार भाजपने दिला. त्यासोबतच आता महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडली जाणार आहे. मात्र भाजप प्रमाणेच कॉग्रेसमध्येही उमेदवारांच्या इच्छूकांची मोठी रांग आहे.
त्यात आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे ही नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्यात रविंद्र धंगेकरांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा कसबा मतदार संघ म्हणजेच बालेकिल्ला काबीज केला. त्यामुळे रविंद्र धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. काम करणारा माणूस अशी ओळख असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या प्रतिमेचा शहरभर विस्तार करून मतदारांना साकडे घालण्याचा कॉंग्रेस प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. Lok Sabha Election 2024
त्यातच पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांना मिळालेला पाठिंबा. त्यांची मतदारांमध्ये असलेली क्रेझ पाहून कॉंग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकते. त्यातच सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपला पाडण्याची ताकद असलेला उमेदवारही त्यांना म्हंटले जाते.
कसबा विधानसभेच्या वेळी त्यांची ताकद सर्वांनी पाहिली. मात्र त्यांच्यासोबतच मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांचीदेखील नावं चर्चेत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेमकी कोणाला उमेदवारी घोषित करतात, हे पाहणं महत्वाचं आहे
