Lok Sabha Election 2024 : महिला कुस्तीपटूंवर लैगिंक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का! अखेर भाजपने घेतला मोठा निर्णय…

Lok Sabha Election 2024 : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेल्या भाजपाच्या विद्यमान खासदार बृजभूषणसिंह यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातील उमेदवारांची उर्वरीत दोघा उमेदवारांची यादी जाहीर केली असून कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून यंदा बृजभूषणसिंह यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र करण शरण सिंह यांना संधी मिळाली आहे.

भाजपच्या स्थानिक निवड समितीकडून येथील जागेसाठी बृजभूषणसिंह यांचेच नाव देण्यात आले होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ निवड समितीने खासदार सिंह यांचे तिकीट कापून त्यांच्याजागी त्यांचे सुपुत्र करण शरणसिंह यांना तिकीट दिले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष राहिलेले बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगीता फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते.
या सर्व कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीत धरणे आंदोलनही केले होते. त्यांनतर बृजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.
पश्चिम उत्तरप्रदेशात राजपूत ठाकूर समाजाचे वर्चस्व आहे. या समाजातील ५ नेते राज्याचे मुख्यमंत्री होते. दोन नेत्यांनी पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली होती. बृजभूषण हे सुद्धा ठाकूर समाजाचे नेते आहेत. कैसरगंजसह आसपासच्या ६ लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे.
भाजपने उत्तरप्रदेशातील २७ लोकसभा मतदारसंघात ठाकूर समाजाच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. गाझियाबाद येथून व्ही. के. सिंह यांचेही तिकीट कापण्यात आले. त्यामुळे भाजपविरोधात ठाकूर समाजात प्रचंड नाराजी आहे. या समाजाच्या नेत्यांनी महापंचायत घेऊन भाजपला विरोध दर्शविला आहे.
या पार्श्वभूमीवर बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापताना भाजपपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. ठाकूर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर कैसरगंज येथून त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी देण्याचा तोडगा काढला आहे.
शुटिंगचे राष्ट्रीय खेळाडू असलेले करण भूषण सध्या उत्तरप्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. वडिलांवरआरोप झाल्यानंतरही ते या पदावर निवडून आले होते. करणभूषण पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, विशेष म्हणजे बृजभूषणसिंह हे आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते, पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना संधी न देता थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.