भयंकर घटनेने कोल्हापूर हादरलं!लिव्ह इन रिलेशनशिप, तिचा नकार अन् त्याने सगळं संपवलं…

कोल्हापूर : एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरातील सरनोबतवाडी परिसरात घडला आहे.
आरोपीने तरुणीवर धारदार चाकूने एकच वार केला, आणि तो इतका वर्मी लागला की तरुणीचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पुढील तपास सुरू केला आहे.
समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सतीश यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मयत तरुणी समीक्षा आणि आरोपी सतीश दोघेही कोल्हापूरचे रहिवासी आहेत. सुमारे पाच महिन्यांपूर्वी, त्यांनी आणखी एका मैत्रिणीला सोबत घेऊन एक ‘इव्हेंट कंपनी’ सुरू केली होती. हे तिघेही एकत्र एका फ्लॅटमध्ये राहत होते.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून काम नसल्याने त्यांना घरभाडे देणेही अवघड झाले होते, ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, सतीश यादवने समीक्षेशी लग्नाची मागणी घातली होती, पण तिने नकार दिला होता. चार दिवसांपूर्वी सतीश आणि समीक्षामध्ये मोठा वादही झाला होता. या वादानंतर समीक्षा आणि तिची दुसरी मैत्रीण तो फ्लॅट सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती.
दरम्यान, मंगळवारी समीक्षा आणि तिची मैत्रीण फ्लॅटवरील आपले साहित्य घेऊन जाण्यासाठी पुन्हा त्या फ्लॅटवर आल्या. यावेळी सतीशने समीक्षाशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, सतीशने चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि तिथून पसार झाला.
सतीशने समीक्षावर एकच वार केला होता, पण तो इतका तीव्र होता की चाकू समीक्षाच्या बरगडीतच अडकला आरोपीने बाहेरून कडी लावल्यामुळे समीक्षाचा मैत्रिणीच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने तातडीने या घटनेची माहिती अन्य एका मित्राला आणि समीक्षाच्या बहिणीला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.