‘चल आपण पहिला नंबर ठरवू…’, विद्येच्या मंदिरातच शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत लज्जास्पद कृत्य!

पुणे :विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींचा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकानेच गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील एका शाळेत तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेत 18 डिसेंबर रोजी प्रदर्शनाची तयारी सुरू असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास जेव्हा विद्यार्थिनी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त होत्या, तेव्हा या शिक्षकाने मुलीचा हात धरून तिला जवळ बसवले आणि स्पर्धेचे निकाल ठरवण्याच्या बहाण्याने लज्जास्पद कृत्य केले. त्या वेळी शिक्षकाने विद्यार्थिनीचा हात धरून ‘आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू’ असे म्हणून तिच्या शेजारील बाकावर बसला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित मुलीने तत्काळ घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी रात्री उशिरा यवत पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत. यवत पोलिसांनी प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे (रा. पारगाव) नावाच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

