विठुराया पाऊस पडू दे, प्रत्येकाला चांगले दिवस येऊ दे..!! मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं साकडं..

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक पहाटे विठ्ठलाची पूजा केली. यावेळी मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.
विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठुनामाचा गजर सुरू केला. यावेळी विठुरायाच्या पाऊस पडू दे सगळ्यांना चांगले दिवस येऊ दे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे केली.
आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते प्रथेनुसार पूजा करण्यात आली.
महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे. यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते.
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण पंढरपूर यावेळी भक्तीमय झाले आहे.