कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणार म्हणजे आणणारच!! मनोज जरांगेंचा एल्गार…

नांदेड : कोणाचाही बाप आडवा येऊ दे, आता मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणार असल्याचा एल्गार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चातून मराठा समाजासाठी हा विजय मिळवून आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नांदेड दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधताना या मोर्चाचे महत्त्व अधोरेखित केले. आंदोलन कधी ठरवून यशस्वी होत नाही, आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो. २९ ऑगस्टचा मोर्चा हा शेवटचा लढा आहे, कोणीही घरी राहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी कसलीही जहागीरदाराची औलाद असो, मराठ्यापुढे टिकू देणार नाही, असे ठामपणे सांगितले. मागील मोर्चाच्या तुलनेत या वेळी पाच पटीने जास्त मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकाऊ आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मोर्चा निर्णायक ठरणार असून, “मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनातून आरक्षणाच्या लढ्याचा शेवट करून समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची तयारी स्पष्ट दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सलग दौरे, भाषणं आणि बैठकांमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. नांदेडमधील बैठकींच्या ताणामुळे त्यांना अस्वस्थता जाणवली. प्रकृती बिघडल्याचे समजताच नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आणि त्यांची प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.