बिबट्यांचे हल्ले वनअधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावेत! पिंपळसुटीच्या निकम कुटुंबीयांचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंकडून सांत्वन…..

शिरूर : तालुक्यात बिबट्यांचा धुमाकुळ सुरू असल्याने वनअधिकाऱ्यांनी अशा भागात तातडीने पिंजऱ्यानची व्यवस्था करावी, या घटना गांभीर्याने घ्याव्यात. दुर्घटनाग्रस्थ निकम कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळण्याबाबत पत्र दिले आहे, याबाबतही पाठपुरावा करीत आहे. वैयक्तिक पातळीवरही सहकार्य केले जाईल, असे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी सांगितले.

पिंपळसुटी (ता.शिरूर) येथे मंगळवारी (ता.२४) बिबट्याने केलेल्या हल्यात रक्षा अजय निकम (वय ४ वर्ष) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर तालुक्यातून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात असून बिबट्यांचा बंदोबस्त कधी करणार, असा सवाल केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी आज घटनास्थळी भिल्लवस्ती येथे पाहणी केली, त्यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेत मुलीच्या आई-वडीलांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामस्थांसह तातडीची बैठक घेत कटके यांनी याभागातील इतर समस्याही जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

विशेषत: वनविभाग आणि महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना या भागातील आज पर्यंतच्या कामासंदर्भांतील अहवाल मागविला आहे. तसेच, घडलेल्या घटनेची माहिती घेत आमदार कटके यांनी लगतच्या परिसरासह नदीच्या काठापर्यंत पाहणी ही केली. नदीकाठ तसेच लपणक्षेत्र अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने आमदारांनी थेट वनअधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क करीत बिबट्यांचे हल्ले गांभीर्याने घ्यावेत, या भागात तातडीने पिंजरे लाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार कटके म्हणाले की, मांडवगण फराटा, रांजणगाव सांडस या भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटे जेरबंद झाले आहेत. मांडवगण फराटा या परिसरात अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे. याठिकाणी बंदोबस्त करण्याच्या सूचना वनवनविभागास केल्या आहेत. पिंपळसूटी, शिरसगाव काटा तसेच पूर्व भागातही बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने तेथीही पिंजरे लावण्याच्या सूचना वनविभागास केल्या असल्याचेही आमदार कटके यांनी सांगितले.