लिंबू, काळा कपडा ते महिलांचे फोटो, भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा, नेमकं घडलं काय?

भिवंडी : स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावात हा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कबीर दिलीप चौधरी आणि निखील संतोष पाटील या दोघांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर पोलिस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जूनच्या मध्यरात्री ते ४ जुलै या कालावधीत पिंपळास गावातील स्मशानभूमीत लिंबांवर अनोळखी महिलांचे फोटो चिकटवून, त्यावर काळा कपडा बांधून अघोरी पूजा करण्यात आली.

हे साहित्य जाणूनबुजून अशा ठिकाणी ठेवण्यात आले होते, ज्यामुळे संबंधित महिलांच्या जीवाला धोका निर्माण व्हावा.या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अघोरी प्रथा आणि जादूटोणा याबाबत जनतेच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
याची माहिती मिळताच पोलिस पाटील अशोक उमाकांत जाधव यांनी कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जादूटोणा, नरबळी, अघोरी प्रथा यासारख्या अमानवी प्रथांवर बंदी घालणाऱ्या २०१३ च्या कायद्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर शिक्षा होऊ शकते.