जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी फरार ? फोन बंद… पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. या जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे तो रद्द झाला आहे.

तसेच १८०० कोटी मूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत पार्थ पवार, त्यांचे वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पार्थ पवार अडचणीत सापडलेल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू, या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितानुसार, बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे. तिचा वास्तव्याचा जो पत्ता आहेत, तिथेही बावधन पोलिसांनी चौकशी केली, मात्र शीतल तेजवानी त्या पत्त्यावरील घरात आढळली नाही. त्यामुळे कदाचित शीतल तेजवानी ही परदेशात गेली असावी अशी शक्यता पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात इमिग्रेशन विभागाला बावधन पोलिसांकडून पत्र पाठवलं जाऊ शकतं. मात्र सध्या शीतल तेजवानी ही फरार असल्याचं बोललं जात आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारूंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.