Lalit Patil Drugs Case : ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात, आता बडी नावे येणार बाहेर?

Lalit Patil Drugs Case : ससून ड्रग्ज प्रकरणात ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या आरोपी ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. सोमवारी मुंबईतील दादर न्यायालयाने ललितची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट मिळवले होते.

त्यानुसार मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार, पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेत त्याला अटक केली. मंगळवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्याला आणण्याकरिता मुंबईला रवाना झाली होती. Lalit Patil Drugs Case :
दुपारी त्याचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाली. त्याच्याकडे आता दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अमली पदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी अटक केली आहे.

ललित पाटील याला ज्यावेळी साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी ललितने ‘मी पळालो नाही, मला पळवण्यात आले’ तसेच यात कोण-कोण सहभागी आहेत, त्यांची नावे सांगणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. ललितच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ससून प्रशासन, येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलिस यांच्यावर संशयाची सुई वळली होती.
मात्र, त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत रोज नवे खुलासे समोर आले आहेत. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करणाऱ्यांच्या संख्येतही रोज भर पडत आहे. दोनच दिवसांपूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ललितचा ससूनमधील मुक्काम कसा वाढवता येईल, यासंबंधीचे पत्र कारागृह प्रशासनाला पाठवल्याचे समोर आले होते. यावरून आता ललित पुणे पोलिसांच्या ताब्यात आल्याने तो किती जणांची नावे घेतो, हे महत्त्वाचे आहे.
रात्री उशिरा गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्यात दाखल झाली आहेत. ललितसोबत शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी यांचाही ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. या सर्वांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.