यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळ निवडीसाठी पाच नंबर गटाकडून ५ लाखाचा निधी, अजून निधी गोळा करणार..

थेऊर : थेऊर येथील यशवंत साखर कारखान्याचे सभासद गेली दहा ते बारा वर्ष राजकीय इच्छाशक्तीकडे आशा लावून बसला होता. त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाल्यानंतर शेवटी स्वतःच आपला यशवंत पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सभासद कंबर कसून कामाला लागले आहेत.
प्रबळ इच्छाशक्ती व कारखाना चालू करण्यासाठी मनापासून धडपड करण्याची तयारी दाखवून स्वतःच हा कारखाना चालू करायचा असा प्रण मनाशी धरून पुन्हा सर्व सभासद कामाला लागले आहेत. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद प्रत्येक गटातील सभासदांनी करण्याचे उद्दिष्ट ठरवून घेतले आहे.
कारखान्याच्या प्रत्येक गटामध्ये बैठका घेऊन कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी पुढाकार घेऊन हा कारखाना पुन्हा चालू करायचा यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे आज पर्यंत कारखान्याच्या चार गटात यशस्वीपणे बैठका घेतल्यानंतर आज पाचव्या गटामधील सभासद शेतकऱ्यांची बैठक पार पडली यात देखील सभासदांनी एकमुखी बिनविरोध संचालक मंडळ निवडणुकीस पाठिंबा दिला.
तसेच काही सभासदांनी पुढाकार घेऊन पाच लाखाचा निधी गोळा केला. माजी संचालक पांडुरंग काळे यांनी तीस लाखाचा निधी प्रशासक संजय गोंदे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर कारखान्याच्या प्रत्येक गटातील सभासदांकडून या निधी व निवडणूक संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत.
यापैकीच चार क्रमांक गटातील सभासदांकडून अकरा लाखाचा निधी नुकताच काळे यांच्याकडे देण्यात आला. यामुळे आता कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.