फेसबुकवरील मैत्री भोवली, विधवा महिलेवर अत्याचार करून घातला ३० लाखांला गंडा

पुणे : एका विधवा महिलेशी फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा फायदा घेत, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी सुमारे ३० लाख रुपये घेऊन, ते परत देण्यास नकार देत, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना संगमनेर शहरातून समोर आली आहे.
याप्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार योगेश सुभाष टोपेकर (रा. आळंदी, पुणे) याच्याविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा सप्टेंबर २०२० ते १ मे २०२३ या काळात घडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी योगेश टोपेकर याची कोविड काळात फेसबुकवर पीडित महिलेशी ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत जवळीक वाढवली. या ओळखीतूनच त्याचे या महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले.
फिर्यादी महिलेशी लग्न करण्याचे आमिष दाखवीत विश्वास संपादन करून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध संगमनेर येथील तिच्या राहत्या घरी आणि शिर्डीतील हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार केला.
यादरम्यान त्याने तिच्याकडून फोन पे, गुगल पे या ऑनलाइन प्रणालीद्वारे सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये घेतले. पीडितेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्याने, मी तुझ्यासोबत लग्न करतो, पैशांबद्दल बोलू नकोस, नाही तर तुझ्या मुलीस मारून टाकीन, अशी धमकी पीडित महिलेला दिली.
दरम्यान, पैसे परत मिळावेत, यासाठी पीडित महिलेने वारंवार योगेश टोपेकर याच्याशी संपर्क साधला असता त्याने मोबाईल बंद करून टाकला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी योगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.