Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात माहिती…

Ladki Bahin Yojana : राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.
विधानभवन येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख २९ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता…
पालकमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२३-२४ मधील मार्च २०२४ अखेर झालेल्या १ हजार ४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १३४ कोटी ९० लाख रुपयांच्या आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५१ कोटी ११ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.