Ladki Bahin Yojana : बँक खात्याशी आपला आधार क्रमांक लिंक करा, लाडक्या बहिणीसाठी महत्वाची सूचना, जाणून घ्या…

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते जमा होणार आहेत.
मात्र, ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम असून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Ladki Bahin Yojana
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेत आतापर्यंत १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे.
पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात येणार आहे.