Ladki Bahin Yojana 2024 : अजित पवार पण ठरणार महाराष्ट्राचे ‘ मामा’! अजित पवार यांच्या ग्रामीण पुणे जिल्ह्यात लाडकी बहिण योजना अल्पवधीतच ठरतेयं लोकप्रिय, महिलांचा मोठा प्रतिसाद…
जयदीप जाधव
उरुळीकांचन : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’- २०२४ योजनेला त्यांच्या स्वतःच्या पुणे जिल्ह्यात अल्पकाळात मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात १ जुलै पासून झालेल्या अर्ज स्विकारण्याचा प्रक्रियेत या योजनेत १० दिवसांत ३५,८९८ इतक्या इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून तब्बल ७९,७३५ महिलांनी ऑफलाईन अर्ज भरल्याने योजनेला पहिल्या टप्प्यात उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना -२०२४ जाहीर केली आहे.महिलांना अर्थिकदृष्ट्या मदतीचा हात म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे.
या योजनेत राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहिना प्रत्येकी १५,०० रुपये रक्कम महिलांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे.या योजनेची घोषणा होताच जिल्हा , तालुका पातळीवर महिला बालकल्याण विभाग, ग्रामविकास विभाग तसेच महसूल पातळीवर योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू झाली आहे.अंगणवाडी पर्यवेक्षक,अंगणवाडी सेविका , प्रकल्प अधिकारी , ग्रामसेवक, महा -ई -सेवा , सेतू केंद्र या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
अंगणवाडी प्रकल्प अधिकारी यांच्याकडून योजनेची जन- जागृती सुरू झाल्यानंतर ३ जुलैनंतर अर्ज भरण्याचा प्रक्रियेला गती मिळाली आहे. ”नारी शक्ती दूत ” अँपवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊन होणे, गती न मिळणे या समस्यांनी या प्रक्रियेला विलंब लागला असला तरी ऑफलाइन पध्दतीने अर्ज स्विकारुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला जाहीर झालेल्या योजनेत योजनेतील मुख्य जाचक अटी असलेल्या अडीच उत्पन्न दाखल्याची अट व रहिवासी अधिवासाची अट तसेच डोमेसाईल दाखला इ. अटी शिथिल करण्यात आल्याने महिलांचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. त्यामुळे योजना लॉंच होण्याअधीच लोकप्रियतेच्या कळसावर पोहचली आहे. या योजनेने निर्धन , दारीद्र रेषेखालील जिवन जगणाऱ्या महिलांना दिलासा मिळाणार असल्याने या योजनेला अल्पवधीत मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. योजनेच्या पहिल्या १० दिवसांत अर्ज भरण्याचा प्रतिसाद वाढला आहे. त्यानुसार केवळ १० दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात
महिलांनी ३५,८९८ ऑनलाईन अर्ज तर ७९,७३५ ऑफलाईन इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल करुन घेतले आहेत. त्यामुळे अल्पवधीतच योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. योजनेच्या पहिल्या ७ दिवसांच्या कालावधीत लाभार्थी अर्ज गावचावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून लाभार्थींच्या सहभागाच्या हरकती ,आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक ,अंगणवाडी पर्यवेक्षक सेविका अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर शासनाकडे योजनेच्या लाभासाठी पाठविण्यात येणार आहे.
अजित पवार होणार महाराष्ट्राचे मामा…
मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवरायसिंह चौहान यांनी ही योजना जाहीर करुन महिलांना दर महा १,००० रुपये लाभ दिला होता. परत त्यांनी २५० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांसह मुलींना कन्यादान योजना, लाडकी बहन योजना सुरू केल्याने ते तिथे लोकप्रिय होऊन आवडते ते’मामा’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.
राज्यात आता अजित पवार यांनी दरमहिना १५०० रुपये योजना जाहीर केली आहे. त्यासाठी बजेटमध्ये ४६ हजार कोटी वर्षाला निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्रात पण लोकप्रिय होण्याची शक्यता असल्याने अजित पवार महाराष्ट्राच्या बहिणींचे ‘मामा’ ठरणार आहेत.
” योजनेअंतर्गत महिलांना अर्ज दाखल करण्यासाठी शासनाच्या वतीने आजपासून पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना घरी बसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल, तसेच सेतू केंद्रांना प्रत्येकी अर्जापाठिमागे ५० रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता अर्ज दाखल करुन घ्यावा,अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक ,ग्रामसेवक , बचत गट महिला स्तरावर ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात उशीर झाला तरी ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहे.”
जामसिंग गिरासे – जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी पुणे जिल्हा परिषद.