Koregaon Mul : कोरेगावमुळ इनामदारवस्ती येथे अत्याधुनिक जिल्हा परिषदेच्या शाळेचे लोकार्पण, माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी बांधली सुसज्ज शाळा…

Koregaon Mul : कोरेगावमुळ इनामदारवस्ती (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामदार वस्ती शाळेची सर्व सोयी सुविधा युक्त भव्य दिव्य इमारत ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी ३३ लाख रुपये लोकवर्गणी व शासनाचे २२.५० लाख रुपये असे एकूण मिळून ५५ लाख रुपये खर्च करून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी सुसज्ज शाळा बांधलेली आहे. नुकताच या शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी द्वारकाबाई सोपान सहादू शितोळे यांच्या शुभहस्ते फित कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले. गेली सहा वर्ष ही शाळा कधी झाडाखाली तर कधी पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. कधीकाळी चांगला नावलौकिक मिळवलेली शाळा इमारती आभावी बंद पडते की काय, अशी शंका ग्रामस्थांना वाटत होती. हल्लीच्या महागाईच्या युगात मुलांच्या शिक्षणासाठी २५ -३० हजार रुपये खर्च करणे हे सामान्य पालकांना परवडणारे नव्हते.
म्हणून या सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी आधार वाटणारी ही शाळा भविष्यात टिकावी यासाठी नर्सरी उद्योजक सोपान साधू शितोळे यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या भावना लक्षात घेऊन आपली स्वतःची तीन गुंठे जागा शाळेसाठी दान केली. तसेच शाळेचा निधी तुटपुंजा असल्याने बांधकामासाठी दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यामुळे बांधण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले व प्रत्यक्ष शाळा बांधकाम फेब्रुवारी २३ मध्ये सुरू झाले. Koregaon Mul

शासनाने तीन वर्ग खोल्यांसाठी २२.५० लाख रुपये निधी डीपीसी मधून उपलब्ध करून दिला. हा निधी पुरेसा नसल्याने इनामदार वस्ती येथील या शाळेचे माजी विद्यार्थी दिलीप शितोळे, मनोज शिंदे, शेखर सावंत इनामदार, संतोष शितोळे, धनंजय शितोळे, धनंजय शिंदे, विशाल कानकाटे, योगेश चौधरी, अमोल संभाजी भोसले, महेंद्र शितोळे, डॉ अमोल जेधे, बापू थेऊरकर, राहुल जगताप तसेच कोरेगावमूळ ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश कानकाटे, युवा उद्योजक स्वप्निल सावंत इनामदार, कांचन पतसंस्थेचे संचालक अशोक सावंत इनामदार, निवृत्ती वायकर, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेथे, बापुसाहेब बोधे, वैशाली सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या इमारतीसाठी आपले बहुमोल असे योगदान दिले व लोक वर्गणी करण्याचा दृढ निश्चय केला काही ग्रामस्थांनी वस्तुरूपाने तर काही ग्रामस्थांनी रोख स्वरूपात निधी जमा केला.
आधुनिक इमारती बरोबरच शाळेसाठी किचनरुम, बोअरवेल, टॉयलेट दोन युनिट, रनिंग गार्डन, आर ओ फिल्टर, पेविंग ब्लॉक, साऊंड सिस्टिम, संगणक सुविधा, पंखे, बोलक्या भिंती, ग्रीन बोर्ड, खुर्च्या टेबल, सुसज्ज मुख्याध्यापक ऑफिस, स्लाइडिंग विंडो, रेलिंग, इन्व्हर्टर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी देखणी जिल्हा परिषदेची शाळा असू शकते यावर विश्वासच बसणार नाही. अशी एक सुसज्ज इमारत आज या ग्रामस्थांच्या योगदानामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध झाली आहे.
यामध्ये पुष्पलता गायकवाड, केंद्रप्रमुख राठोड सर, मोरे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुंजाळ सर, साळुंखे सर यांचेही मोलाचे योगदान लाभले. शिक्षक पालक व सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या कार्यक्रमाप्रसंगी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सर यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक वसंत ठोंबरे गुरुजी होते.
याप्रसंगी गोरखभाऊ कानकाटे, हवेली पं.स. गटशिक्षणाधिकारी शिवाजी नागवे, रामदास चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार मॅडम, साळुंखे सर यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक संतोष शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्व उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला. याप्रसंगी यापूर्वी शाळेत काम केलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. इनामदारवस्तीच्या या जिल्हा परिषद शाळेला भव्य दिव्य सुसज्ज इमारत उपलब्ध झाल्याने सर्व पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आभार निलेश बोरकर यांनी केले.