अपहरण केलं, मध्यरात्री सुनसान जागेवर नेऊन विवस्त्र केलं अन्…, पुण्यात घडलं भयंकर

पुणे : संस्कृतीचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. पण दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणे वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच एक धक्कादायक प्रकरण पुन्हा समोर आले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात आर्थिक वादातून एका ३१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार त्याच्या जवळच्या मित्रांनीच केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्यरात्री अपहरण, विवस्त्र करणे, मारहाण, व्हिडीओ चित्रीकरण आणि थेट गोळीबाराचा प्रयत्न या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही भयावह घटना घडली. पीडित तरुण वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहे आणि तो कोंढवा भागात राहतो. आरोपी हे त्याचे ओळखीचे असून, आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहिती नुसार, हा वाद चिघळल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. आरोपींनी त्याला गोकुळनगरजवळील एका शांत आणि मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्याला पहिले पूर्णपणे विवस्त्र केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि क्रूरपणे मारहाण केली.
या संपूर्ण प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय शिवीगाळ करताना मंगेश माने याने कारमधील पिस्तुलाचा धाक दाखवला. पीडिताने पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर गोळीबारही करण्यात आला, परंतु सुदैवाने तो बचावला.
या प्रकरणी पीडित तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.