कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या मुलीचं नाव जाहीर, अर्थही तितकाच सुंदर…

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक असलेल्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी या वर्षी जुलै महिन्यात कन्यारत्नाचा जन्म झाला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये एकच चर्चा होती. या कपलच्या मुलीचं नाव काय असणार? अखेर शुक्रवारी कियाराने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करत सर्वांची उत्सुकता संपवली आहे.

तसेच अखेर कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचं नाव या पोस्टद्वारे सर्वांना सांगितलं आहे. या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहते लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ असं ठेवलं आहे. आमच्या प्रार्थनांपासून आमच्या बाहूंपर्यंत, दैवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारीपर्यंत.. असं कॅप्शन देत दोघांनी मुलीचं नाव सांगितलं आहे. सरायाह हे नाव हिब्रू शब्द सारापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे, ज्याचा अर्थ राजकुमारी असा होतो. तर कियारा आणि सिद्धार्थ ही दोन्ही नावं मिळून सरायाह असं ठेवल्याचीही कमेंट काही नेटकरी करत आहेत.

दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर कियारा आणि सिद्धार्थचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता. ‘आमचं हृदय भरून आलं आहे आणि आमचं जग कायमचं बदललं आहे. आशीर्वादाच्या रुपात आमच्या आयुष्यात मुलीचं आगमन झालं आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
इतर सेलिब्रिटींप्रमाणेच कियारा आणि सिद्धार्थनेही त्यांच्या नवजात बाळाचे फोटो न काढण्यास पापाराझींना विनंती केली होती. ‘सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पालकत्वाच्या या नवीन प्रवासात आम्ही पहिलं पाऊल टाकतोय.
कुटुंब म्हणून याचा जवळून आनंद घेऊ अशी आम्हाला आशा आहे. आमचे हे खास क्षण खासगी ठेवता आले तर आमच्यासाठी ते खूप अर्थपूर्ण असेल. म्हणून कृपया कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ घेऊ नका. फक्त आशीर्वाद द्या’, अशी विनंती त्यांनी केली होती.
