खरातचा नवा कारनामा उघड! सरकारी यंत्रणेला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले..

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत असताना नाशिकमधील झालेल्या घोटाळ्यात आता खरातचे नाव समोर आले आहे.नाफेड आणि NCCF मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत तब्बल 1200 ते 1300कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर आता त्याच्या पोलीस कोठडीत देखील वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिक मध्ये झालेल्या या घोटाळ्यात अशोक खरातच्या श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीने सरकारी यंत्रणेला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या नावावर मोठी लूट केल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे या कंपनीला मान्यता देण्याची प्रक्रिया अत्यंत संशयास्पद आणि घाईघाईत पूर्ण करण्यात आली. या घोटाळ्याचे सर्वात धक्कादायक स्वरूप शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यांमधून समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?

मार्च 2024 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले होते, तेव्हा या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 250 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या इच्छुक होत्या. या कंपनीच्या मान्यतेची प्रक्रिया अधिक संशयास्पद असल्याचे समोर आले.ज्या शेतजमिनींच्या 7/12 उताऱ्यावर कागदोपत्री कांदा पीक दाखवून सरकारला विक्री केल्याचे नोंदवले आहे, त्या जमिनींवर प्रत्यक्षात द्राक्षबागा आहेत. यातून असे स्पष्ट होते की, कागदावर कांदा दाखवून सरकारची कोट्यावधीची फसवणूक केली आहे.
दरम्यान नाफेड आणि NCCF च्या काही बड्या अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मदत केल्याचे प्राथमिक पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. हा केवळ आर्थिक घोटाळा नसून तो शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर मारलेला दरोडा आहे.
खरातचा हा नवीन कारनामा उघड झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता उच्चस्तरीय SIT नेमून याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.