खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला! मोबाईलमध्ये व्हीआयपी राजकारण्याचे नंबर, कोर्टात नेमकं काय घडलं?


पुणे : महिलांना फसवून अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खरातला आज तिसऱ्यांदा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम व्ही भराडे यांनी खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

अध्यात्मक गुरु असल्याचं भासवत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरातला तीन दिवसाची पोलीस कोठडी कोर्टात सुनावण्यात आली आहे. खरात मागील दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती एसआयटीने कोर्टात दिली आहे. शिवाय आता अशोक खरातबाबत अत्यंत संवेदनशील माहिती देखील समोर आली आहे. अशोक खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला असून त्याचा तपास बाकी आहे. यात विविध राजकीय नेत्यांचे नंबर असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे.

आरोपी अशोक खरात हा अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्या नावावर अनेक जंगम मालमत्ता आहेत. त्याचा अधिक तपास करायचा आहे. त्याच्या मोबाईल मध्ये अनेक राजकीय व्यक्तींची नावं त्याने कोडवर्ड किंवा दुसऱ्या नावानं सेव्ह केल्याचा पोलिसांना संशय आहे. याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं.

तसेच फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झाला, असंही तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टात माहिती दिली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. यानंतर कोर्टाने खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याला 1 एप्रिलला कोर्टात हजर करावं लागणार आहे. त्यामुळे तपासातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!