खरात प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद ; खरातला भेटलेल्यां सगळ्यांची HIV टेस्ट करा, अन्यथा महाराष्ट्रावर संकट.. कोणी केली मागणी?

मुंबई: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या विकृत कारनाम्यांचे पडसाद आज विधीमंडळात उमटले.खरात प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप करत खरातला जे जे लोक भेटले त्या सर्वांची HIV टेस्ट करा अशी मागणी केली आहे.

विधिमंडळात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असे म्हटले की,महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे? या भोंदू महाराजाचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात अनेक राजकीय नेते, महसूल विभागाचे बडे अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. या सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. हा बाबा ‘अशोक जल’ बनवायचा आणि त्यात ‘व्हायग्रा’ मिसळायचा, असा खळबळजनक दावाही वडेट्टीवारांनी केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
अशोक खरात या माणसाला जे जे लोक भेटले आहेत, त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावर मोठे संकट येईल,” असा विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे खरात याच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले आहेत.
यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला. अशोक खरातसोबत ज्या ज्या व्यक्तींचे फोटो समोर आले त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. “पुरोगामी महाराष्ट्र म्हणवता आणि अशा भोंदू बुवांचे पाय धुता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी टीकेची झोड उठवली.