खडकवासला–फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचा ‘हिरवा कंदील’ – आमदार राहुल कुल


 

पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर भूमिगत बंदनळी (कालवा) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. या प्रकल्पासंदर्भात शनिवार (दि. ३० ऑगस्ट) रोजी कार्यकारी अभियंता योगेश सावंत आणि मेगा इंजिनिअर्सचे व्यवस्थापक राजा यांच्या उपस्थितीत आमदार राहुल कुल यांनी सविस्तर चर्चा केली. प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि समन्वयाने पूर्ण करण्याबाबत बैठकीत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

सुमारे २२०० कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास राज्य सरकार, केंद्र शासन तसेच संबंधित तांत्रिक संस्थांची सर्व मान्यता मिळालेली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘हिरवा कंदील’ दाखविल्यामुळे आता या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू होण्यास कोणताही प्रशासकीय अडथळा उरलेला नाही.

या प्रकल्पाद्वारे खडकवासला धरणातील पाणी भूमिगत बंदनळीमार्फत थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचवले जाणार आहे. यामुळे पारंपरिक उघड्या कालव्यांमधून होणारी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात रोखली जाईल आणि पाण्याची बचत होईल. प्रशासनाच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे दौंड तालुक्यासह ग्रामीण भागातील सिंचनक्षेत्र लक्षणीयरीत्या वाढेल. शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ टीएमसी हंगामी पाणी उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढेल आणि उत्पन्नात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, या प्रकल्पाचा फायदा फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहणार नाही. पुणे शहरातील पाणीप्रदूषण नियंत्रणासाठीही या योजनेतून मदत होणार आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवरील ही दुहेरी गरज भागवल्यामुळे राज्यातील हा प्रकल्प ‘महत्त्वाकांक्षी’ ठरणार आहे.

बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकाच धाग्यावर काम करणे आवश्यक आहे. समन्वय साधून दर्जेदार पद्धतीने काम केल्यास हा प्रकल्प जलसंपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल. खडकवासला धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्यासाठी भूमिगत कालवा हा उपाय ठरत असून, या माध्यमातून शेती, ग्रामीण विकास आणि शहरी जलपुरवठा या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!