बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार ; जुन्नर तालुक्यातील घटना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

पुणे : पिंपळवंडी येथील भटकळवाडी (ता. जुन्नर) शिवारातील लेंडेमळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वर्षाची कालवड ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. ९) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, शेतकरी सागर लक्ष्मण निकम यांचा घराशेजारी गोठा असून, बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून कालवडीवर हल्ला करुन तिला ठार केले व जवळच घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात नेऊन फस्त केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पिंपळवंडी व पंचक्रोशीत बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून, या परिसरात बिबट्यांना मुबलक प्रमाणात लपण्यासाठी जागा व पिण्यासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
या ठिकाणी सातत्याने पाळीवर प्राण्यांवर हल्ले होत आहेत.परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून, या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.