Kadambari Jethwani : प्रशासकीय क्षेत्रात खळबळ!! अभिनेत्री आणि मॉडेलचा छळ केल्याप्रकरणी 3 आयपीएस अधिकारी निलंबित…

Kadambari Jethwani : आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवून, तिला अटक करुन तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
त्यामुळे प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे.
मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्रीने एका व्यासायिकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव होता. पण, तिने तक्रार मागे घेतली नाही, म्हणून तिला आंध्र प्रदेशमध्ये खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आणि तिचा सुमारे दीड महिना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.
याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी.सीताराम अंजनेयुलू ( डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा ( महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी ( अधीक्षक दर्जा ) यांचा समावेश आहे. तपासाअंती या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबईतील रहिवासी असलेल्या कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस.व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. त्यात त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, असे म्हटले होते.