K Kavitha : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी के. कविता यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर….
K Kavitha : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के.कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये के कविता यांना मार्चमध्ये ईडीकडून अटक करण्यात आली होती.
गेल्या ६ महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने आमदार के.कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी १५ मार्च रोजी छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. K Kavitha
दरम्यान, के कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा दावा ईडीने केला होता. आज के.कविता यांच्या जामीनावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, तसेच साक्षीदारांवर कोणताही प्रभाव टाकणार नाही, या अटीसंह सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांना जामीन मंजूर केला आहे.
के.कविता यांच्यावर काय आरोप आहेत?
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी १ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने के.कविता यांची त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी चौकशी केली. ही चौकशी जवळपास सात तास चालली होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, के.कविता या आम आदमी पक्षाला १०० कोटींची कथित लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’शी संबंधित आहेत. दिल्लीतील अबकारी धोरण बदलून आपल्याला फायदा मिळेल, असे धोरण आखण्यासंबंधी ही लाच देण्यात आली होती, असा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.