जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात!! परिस्थिती भयंकर, सरकारकडे मागणी काय?

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर आमदार शरद सोनवणे यांनी लक्ष वेधले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली असून, जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत ५५ लोकांना जीव गमवावा लागला आहे
बिबट्याच्या भीतीमुळे लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत नाहीत आणि शेतकरी शेतीत काम करण्यास कचरत आहेत. सोनवणे यांनी सरकारकडे तातडीने या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा अनेक भागात बिबट्यांची मोठी संख्या असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर जिथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, त्या नागपूरपरिसरात देखील बिबट्यांची दहशत वाढू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे, तो म्हणजे ते थेट बिबट्याचा वेष परिधान करून विधानभवनात दाखल झाले आहेत.

आमदारांच्या या पेहरावाने नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले आहे. सोनवणे यांनी विधानभवनात प्रवेश करताच उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्यांनी बिबट्यांच्या हल्ल्यांविषयी सरकारला तातडीने कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते बिबट्यांची संख्या अनियंत्रित वाढत असून सरकारने केवळ उपाययोजनांवर चर्चा न करता प्रत्यक्ष कारवाई सुरू करणे आवश्यक आहे.
आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनात सांगितलं की, राज्यात तब्बल 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या असल्याचा त्यांचा दावा आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले.
नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी सरकार महिलांना, मुलांना आणि शेतकऱ्यांना लोखंडी पट्टा घालण्याचा सल्ला देते, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक भागांत लहान मुले शाळेत जाण्यास घाबरतात, तर नागरिक घराजवळसुद्धा सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत, असे गंभीर वास्तव त्यांनी मांडले.
काही भागांमध्ये बिबटे ऊसाच्या शेतात, तर काही ठिकाणी थेट घरांच्या परिसरात दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सचिव आणि प्रशासकीय यंत्रणा एसी खोलीत बसून निर्णय घेतात; खरं संकट नागरिकांना भोगावं लागतं, असा आरोपही आमदारांनी केला.
