“पत्रकारिता की खंडणी “? खाद्यतेल व्यावसायिकाला कथित पत्रकारांकडून तब्बल १० लाख रुपयांच्या खंडणीची धमकी?


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परवानाधारक खाद्यतेल कंपनीत घुसून व्हिडीओ शूटिंग, पोलिसांचे नाव पुढे करून दोन कथित पत्रकारांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अजूनही जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्यात या कथित पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फ्रीझल फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक हर्षल संदीप धोक्रट (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सागर हंगे या कथित पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल धोक्रट यांच्या उरळी देवाची येथील कंपनीत ‘इंद्रायणी’ या ब्रँडचे खाद्यतेल तयार केले जाते. येथील गोडाऊनमध्ये (२५ फेब्रुवारी) बुधवार रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन इसम अचानक घुसले. त्यापैकी दोघांनी तेथील व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरूवात केली. त्यानंतर “कंपनी अस्वच्छ आहे, पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची जाडी कमी आहे,” अशी तक्रार आली असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला पोलीस कॉन्स्टेबल ननवरे आणि पत्रकार असल्याचे सांगितले.

यानंतर त्यांनी तेथील कंपनीचे ‘इंद्रायणी’ ब्रँडचे स्टिकर, शिक्का व तेलाचा डबा ताब्यात घेतला. आणी धोक्रट व त्यांच्या सहकाऱ्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक अनुपस्थित असल्याचे सांगत जवळपास एक तास थांबवण्यात आले. याचवेळी दोन कथित पत्रकारांनी “१० लाख रुपये द्या, नाहीतर कंपनी बंद पाडू, सोशल मीडियावर बदनामी करून व्यवसाय उद्ध्वस्त करू,” अशी धमकी दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी कात्रज-कोंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये पुन्हा भेट घेण्यात आली. तेथे मोबाईलच्या कॅलक्युलेटरवर १० लाख रुपये टाईप करून “एवढी रक्कम द्यावी लागेल” असे सांगितले गेले. तसेच “सेटलमेंट नाही केली तर एफडीएकडे तक्रार जाईल, बातमी पेपर आणि न्यूज चॅनेलवर लावू,” अशी धमकी कथित पत्रकारांकडून धोक्रट यांना देण्यात आली.त्यानंतर त्यांनी वारंवार फोन व व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून पैशांबाबत चौकशी केली. “पैसे नाही दिले तर त्रास होईल,” अशी धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर धोक्रट यांनी त्यांच्या कंपनीकडे महाराष्ट्र शासनाचा वैध खाद्य परवाना असून सर्व कामकाज नियमानुसार चालते. कोणतेही गैरप्रकार नसल्याचा दावा करत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून “पत्रकारिता की खंडणी?” असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!