जम्मू -कश्मीरच्या कुलगामध्ये अकोला जिल्ह्यातील जवान शहिद ! २४ वर्षीच देशासाठी वीरमरण ….
अकोला : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.
शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला आहे. प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्याची माहिती गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. कुटुबियांसह पत्नी आणि आईने एकच टाहो फोडला आहे. दरम्यान, प्रवीण प्रभाकर जंजाळ असे २४ वर्षीय शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. २०१९ मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले.
त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नीी शाममाला प्रवीण जंजाळ, आई शालू प्रभाकर जंजाळ, वडील प्रभाकर जंजाळ, भाऊ सचिन प्रभाकर जंजाळ असा परिवार आहे. शहीद जवानाचा मृतदेह नेमका कधी गावी येणार याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाला कोणत्याच सुचना नाहीत. शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. विशेष म्हणजे कालच प्रवीण यांनी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी ३९ हजार रुपये पाठवले होते.