जरांगे यांचं आंदोलन रोहित पवार यांचं आयटी सेल चालवत होतं, पवार कुटुंबानीच ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाकेंच्या आरोपाने एकच खळबळ….

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात काल मोठा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आलं आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे.

मात्र मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असले तरी आता राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष उसळलेला आहे. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, पवार कुटुंबियांनी ओबीसींचे आरक्षण संपवले. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचा थेट पाठिंबा जरांगे आंदोलनाला होता. एवढंच नाही तर रोहित पवारांचा आयटी सेल हे आंदोलन चालवत होता, हे ओबीसी समाज जाणतो.

लक्ष्मण हाके म्हणाले की, या बेकायदा आंदोलनाला उभं करण्याचं काम शरद पवारांनी केलं. सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे यांनी थेट सपोर्ट केला. अजित पवार गटातील आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी यांनीदेखील पाठिंबा दर्शवला. कोण माणसं पुरवत होतं, कोण गाड्या देत होतं, कोण पत्रकार परिषदा घेत होतं हे सगळं राज्यातील ओबीसी समाजाला माहिती आहे. असे ते म्हणाले आहे.
त्यांनी पुढे आरोप केला की, सरकारने काढलेला जीआर हा बेकायदेशीर आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे कोर्टाने नाकारले आहे. पण आता या निर्णयामुळे थेटपणे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. पवार कुटुंबियांनीच हे आरक्षण संपवलं आहे.