देशाला हादरवणारं जामताडा रॅकेट, 100 हून अधिक जणांना अटक! खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये मध्यरात्री छापा, पुण्यात धक्कादायक प्रकार…

पुणे : पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. खराडी येथे पोलिसांनी प्राईड आयकॉन या इमारतीमधील खोट्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मध्यरात्री छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.

दरम्यान, या कारवाईत १०० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून, सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुण्यातील या प्रकरणाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी’ नावाचे हे कॉल सेंटर अमेरिकेतील लोकांना फसवत होते. हा एक मोठा सायबर फ्रॉड असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, यात ४१ मोबाईल फोन आणि असंख्य लॅपटॉप समाविष्ट आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे या फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
छापा टाकल्यानंतर पोलिसांनी १०० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. उर्वरित ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
