जालिंदरनगर आणि वाबळेवाडी शाळेचा पॅटर्न राज्यात राबविणार; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती…


पुणे: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर) (ता.खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरुर) शाळेत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास आदी बाबींची राज्य शासनाने दखल घेतली असून या बाबी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा ही ‘टी ४’ जागतिक संस्थेने केलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली असून या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामस्थांसोबतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळ भुसे यांनी जालिंदरनगर शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी येथील शाळेला भेट दिली आहे.

कार्यक्रमास आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संचालक (योजना) कृष्ण कुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक संस्था, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, शिक्षक दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषद वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळा लोकसहभागातून विकसित केली आहे. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, सामाजिक सेवाभावी संस्था यांनी खऱ्या अर्थाने अथक कष्टातून जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला राज्य, देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक, मानांकन मिळवून दिला आहे. गावाने ठरवले तर शाळेच्या विकासाचे चित्र बदलू शकतो, हा एक आदर्श येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. या माध्यमातून वारे यांनी केलेले कार्य आपल्याकरिता प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांची दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीची ‘डाटा बँक’ तयार करण्याचे काम सुरू

राज्यात विविध आदर्श, प्रतिभावंत, उपक्रमशील शिक्षक असून ते समर्पित भावनेने ज्ञानदानाचे काम करीत असतात, त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या उपक्रमशील शाळेचे अनुकरण करावे. राज्यशासनाच्यावतीने अशा समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची ‘डाटा बँक’ तयार करण्याचे काम सुरु आहे. वारे यांनी राज्यातील या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करावे. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित काम करुया, असे आवाहन भुसे यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!