मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेलबाहेर…

बीड : गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. जयराम चाटेच्या भावाचे दोन मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता.

यामुळे अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला विधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ठराविक वेळ दिला आहे. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला असून त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाचा 12 व्याचा विधी होत आहे.
यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यायची आहे. हे प्रकरण राज्यात मोठ्या प्रमाणावर गाजले आहे. यामुळे लोकांच्या मनात राग आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागणार आहे. याबाबत वकिलांनी माहिती दिली आहे.

यामध्ये न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अनेकांनी केला होता. उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह असून ही केस महाराष्ट्राची आहे. सव्वा वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.