‘ जय भवानी.. जय शिवाजी..! खोचीच्या ‘हिंदवी पेठ ‘मंडळाचा भव्य दिव्य अनोखा उपक्रम, ऐतिहासिक पन्हाळा गडावरून खोचीत पायी पालखी..


खोची (कोल्हापूर ): कोल्हापूर जिल्ह्यातील खोची या गावातील ‘हिंदवी पेठ ‘ या मंडळाचे असंख्य शिवभक्त प्रत्येक वर्षी शिवजयंती ही ऐतिहासिक पारंपरिक पद्धतीने साजरी करत असतात. यावर्षीही या मंडळाचे शिवभक्त पारंपारिक पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर असलेल्या छत्रपतींच्या मंदिरातून ‘शिवज्योती ‘आपल्या गावी घेऊन आले. विशेष म्हणजे किल्ले पन्हाळा ते खोची अशी शिवरायांची पायी पालखी या शिवभक्तांनी मोठ्या जयघोषात आपल्या मंडळात आणली.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पन्हाळगडावरून पायी येत शिवरायांची पालखी खोचीतील हिंदवी पेठ मंडळाच्या शिवभक्तांनी गावात आणली. यावेळी मोठ्या ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताक्यात तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय होऊन गेला. पालखी गावात येताच शिवरायांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली.

विशेष म्हणजे या हिंदवी पेठ मंडळाचा अनोखा उपक्रम पाहून संपूर्ण गाव छत्रपती शिवरायांच्या जयघोषात शिवमय होऊन गेले. छत्रपती शिवरायांची किल्ले पन्हाळा ते खोची पायी पालखी आणताना ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचे अश्व देखील होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय बनला.

ऐतिहासिक पन्हाळागडावर पुणे, सांगली,सातारा,कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषात हिंदवी पेठ मंडळातील शिवभक्तांनी शिवज्योतीसह पालखी आपल्या खोची या गावी आणली. या आधुनिक काळात तरुण पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी, आणि आपल्या परंपरा जपल्या जाव्या असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते पतंगराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष प्रमोद थोरवत,अजित पाटील, सोनाजी वाघ संभाजी थोरवत,अरविंद पोवार, संकेत पोवार, भीम घाटगे, सागर भोसले,शुभम लोहार,सुमित वाघ,अजित बाबर,सचिन घाटगे आदी हिंदवी पेठ खोचीचे शिवभक्त उपस्थित होते.

तसेच हिंदवी पेठ मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम आणि व्याख्यान आणि शिवचरित्र कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!