हॉटेल चालकावर गोळीबाराचा प्रयत्न होऊन झाले बारा दिवस! उरुळीकांचन पोलिसांना गुन्ह्याची उकल होईना! आरोपी गुन्हा करुन मोकाट…

उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) हद्दीतील प्रयागधाम ते पेठ रोड परिसरात असलेल्या ‘कबीर चायनिज सेंटर’ येथे एका अज्ञात इसमाने हॉटेल मालकावर बंदूक रोखून गोळीबाराचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात बंदुकीतून गोळी न सुटल्याने हॉटेल व्यावसायिक बचावला तरी पोलिसांना बारा दिवस उलटूनही गुन्ह्याचा अद्याप तपास लावता आला नसून गुन्हेगार मोकाट असून पोलिसांना आठ दिवस उलटून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची उपरती आली आहे.

या चायनीज हॉटेल चालकावर बुधवारी (दि. 04 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा गोळीबाराच्या ठिकाणी गोळी न सुटल्याने हॉटेल चालक बचावला आहे. मात्र गोळीचे काडतुस हे घटनास्थळी मिळून आले आहे.
मिलिंद बापू शेलार (वय-38, व्यवसाय शेती व हॉटेल, रा. नायगाव, ता. हवेली) असे हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी मिलिंद शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात तीन इसमांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा गुरुवारी (दि. 12) दाखल केला आहे. मात्र आरोपींचा मार्ग पोलिसांना मिळत नसल्याने आरोपी हा गुन्हा पचवून मोकाट आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान या घटनेत अज्ञात आरोपींनी गोळीबार करुन त्याच्या दोन साथीदारांसह दुचाकी वाहनावरुन पेठ चारवाडा रस्त्यामार्गे पळ काढला आहे. मात्र पोलिस यंत्रणेला बारा दिवस उलटूनही या गंभीर गुन्ह्याचे धागेदोरे हाती अद्याप लागले नसल्याने तपास प्रक्रियेबाबत संशय उत्पन्न केला जात आहे.