राष्ट्रवादीच ठरलं!राज्यात पहिल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा, जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला, कोणाला दिली संधी?

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे.अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यातील नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी मोठा डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.

मागील काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्य करून ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना घेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू होते. मात्र, या विषयांकडे दुर्लक्ष करत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून होमग्राउंडवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी आनंदराव मलगुंडे यांना ही उमेदवारी दिली आहे.आनंदराव मलगुंडे हे जयंत पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आरक्षणात नगराध्यक्षपदाची जागा ही ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आनंदराव मलगुंडे यांना ही उमेदवारी दिली आहे. आनंदराव मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य व्यक्तीमत्व आहेत. शिवाय मलगुंडे यांनी याधीही नगराध्यक्ष पद सांभाळले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा अनुभवी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

दरम्यान मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्षपदासाठीचे पहिले उमेदवार ठरले आहेत. काल, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

