पुण्यात आयटी अभियंत्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं! हुंड्यासाठीच्या दबावामुळे घेतला टोकाचा निर्णय…

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. त्यानंतर हुंडाबळी थांबवण्यासाठी शासनासह सामान्य नागरिक सुद्धा पुढे आले. मात्र, या घटना काही थांबताना दिसत नाहीत. अशीच एक हुंडाबळीची घटना पुण्यातील वाकड परिसरात घडली आहे.
दिव्या हर्षल सूर्यवंशी या २६ वर्षीय विवाहित महिलेने नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दिव्याचा पती हा आयटी अभियंता आहे. तर दिव्याचे सासरे हे एक शिक्षक असल्याची माहिती आहे.
वाकड परिसरात असणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिव्या हर्षल सूर्यवंशी या विवाहित महिलेने गळफास घेऊन आपला जीव दिला. दिव्याने जीव दिल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी दिव्याचा खून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.

दिव्या ही मूळची धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. तीन वर्षांपूर्वी हर्षल सूर्यवंशी या आयटी अभियंत्यासोबत तिचा विवाह झाला होता. दिव्याचे वडील भाऊसाहेब खैरनार हे एक शेतकरी आहेत. लग्न ठरवताना यांच्याकडे दिव्याच्या सासरच्या मंडळींनी ४० तोळे सोन्याची मागणी केली होती.

त्यानुसार पाच लाख रुपये खर्च करून आधी साखरपुडा झाला. त्यानंतर जवळपास २० लाख रुपये खर्च करत मोठ्या थाटामाटात भाऊसाहेब खैरनार यांनी दिव्याचे आणि हर्षलचे लग्न लावून दिलं.
मात्र, लग्नानंतर सहा महिन्यांनीचं हर्षल सूर्यवंशी ने दिव्याला त्रास द्यायला सुरुवात केली. सातत्याने पैसे मागणे, मला सोनं करून द्या, नवीन फ्लॅटसाठी फर्निचर करून द्या अशा मागण्या सुरू केल्या. दिव्याला नोकरी मिळत नसल्याने नवऱ्यासह सासू-सासरे ननंद मानसिक व शारीरिक छळ करत होते. या होणाऱ्या छळाची माहिती दिव्याने आपल्या आईला दिली होती.
मात्र, आपल्याकडे असं चालत नाही थोड्या दिवसानंतर सुधारतील तू तिथेच रहा, असं दिव्याच्या आईने तिला सांगितलं होतं. मात्र, त्यावेळेस दिव्याच्या आईला सुद्धा माहित नव्हतं की आपल्या मुलीचा हे लोक जीव घेतील.
दरम्यान, अखरे अन्वित छळाला कंटाळून दिव्याने आपलं जीवन संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या दिव्याच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
