इस्त्राईल- इराण युद्धामुळे महागाईचा भडका उडणार ; कोणकोणत्या वस्तू महागणार? सर्वसामान्यांच्या खिशावर मोठे परिणाम…

पुणे: इस्त्राईल -इराण युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठे आर्थिक संकट येणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या युद्धाचा तणाव असाच कायम राहिल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊन भारतात महागाईचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या महायुद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडणार असून सध्या 95 ते 105 रुपयांच्या दरम्यान असलेले पेट्रोल थेट 120 ते 135 रुपये प्रति लिटर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच डिझेल महागल्याने माल वाहतुकीचा खर्च दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार असून याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूच्या किमतीवर होऊन महागाईचा दर 7.5% पर्यंत पोहोचणार आहे.
वाढत्या महागाईला रोखण्यासाठी भारतीय रिझर्व बँक व्याजदर वाढवू शकते. यामुळे नवीन आणि जुन्या गृह कर्जाची तसेच वाहन कर्जाचे हप्ते देखील महाग होण्याची शक्यता या युद्धामुळे वर्तवण्यात आली आहे.सध्या भारताचा इराणसोबत सुमारे एक अब्ज 68 कोटी डॉलरचा व्यापार सुरू आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला, तर या व्यापारात मोठी घट होऊ शकते.

भारत इराणला प्रामुख्याने बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस आणि औषधे निर्यात करतो. याशिवाय औद्योगिक यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग आणि कापूस देखील मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. युद्धामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यास भारतीय निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
इराणकडून भारतात येणारे सफरचंद, पिस्ता, खजूर आणि विविध खनिजांचा पुरवठा खंडित झाल्यास देशांतर्गत बाजारात महागाई वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार असल्याची शक्यता आहे.भारताचे सुमारे 40 ते 50 टक्के कच्चे तेल होरमुझच्या सामुद्रधुनीमार्गे येते. हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युद्धाच्या परिस्थितीमुळे हा मार्ग असुरक्षित झाल्यास तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
. तसेच, इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प, जो भारतासाठी मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे, त्यावरही या युद्धाचे सावट आहे. जहाजांचे विमा हप्ते आणि भाडे 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्यास व्यापाराचा खर्च प्रचंड वाढणार आहे. समुद्री मार्गाने होणाऱ्या तेल व्यापारात इराणच्या क्षेत्राचा 30 टक्के वाटा आहे. युद्धामुळे ही पुरवठा साखळी विस्कळी झाल्यास जागतिक विकास दरात 1.5% टक्के पेक्षा जास्त घट होणार आहे.