हवेलीत अप्पर लोणीकाळभोर तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांची सूचना लागू होत नाही काय! आता अप्पर तहसील स्थलांतरणासाठी महसूलमंत्र्यांवर निर्देश देण्याची वेळ…

जयदिप जाधव उरुळीकांचन : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले तरच हवेली तालुक्याच्या महसूल कारभाराचे भान शुध्दीवर येते अशी तालुक्याच्या कारभाराची तयार झालेली प्रतिमा आणखी एका प्रकाराने चर्चेत आली आहे. हवेली तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय लोणीकाळभोर येथे तयार झालेल्या इमारतीत स्थलांतरीत करावे अशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना देऊनही स्थलांतरीत होत नसल्याची आवस्था हवेली तालुक्यात आहे.

हवेलीत उपभूमिअधिक्षक कार्यालयाच्या कारभाराची घडामोड उघड होत असलेल्या कारणाम्यांनी चर्चेत आहे. त्यामुळे हवेलीत महसूल व भूमिअभिलेख कारभारात सध्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे महसूलीमंत्री ठरवतील तेंव्हाच या ठिकाणच्या कारभाराला तोंड फुटत आहे. अशातच आता अप्पर हवेली लोणीकाळभोरची इमारत तयार होऊन ही अस्थापणा लोणीकाळभोर येथे सुरू होत नसल्याची चर्चा आहे. तीन महिन्यांपूर्वी लोणीकाळभोर येथे जिल्हाधिकारी यांनी कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयाची इमारत तयार होऊन कार्यालय हस्तांतरीत होत नसल्याने तहसील कार्यालयाची नागरीकांना प्रतिक्षा आहे.
अप्पर लोणीकाळभोर कार्यालय हे मूळ तहसील कार्यालय येथे अडगळीत असल्याने नागरीकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने तक्रारीचे केंद्र बनले आहे. नागरीकांसाठी शासनाने स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करुन नागरी सेवेला प्राधान्य दिले असले तरी या मूळ कार्यालया भोवती तयार केलेली यंत्रणा कार्यालय स्थलांतरीत करण्याचा ‘आड’ येत असल्याची चर्चा हवेलीत आहे.

हवेली तालुक्याचा महसूल विभागाचा प्रचंड व्याप्त कारभार पाहता राज्य शासनाने ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी अप्पर लोणी काळभोर या कार्यालयाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १९६६ (१३) पोटनियम ३ अंतर्गत मंजूरी दिली आहे. हवेली तालुक्याची सुमारे ४० लाख लोकसंख्या महसूल कार्यालया अंतर्गत येत असल्याने पिंपरी चिंचवड पाठोपाठ अप्पर लोणी -काळभोर अशा पध्दतीने कार्यालयाचे कामकाज विभागले गेले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील नव्याने तयार झालेल्या ८ महसूल मंडल कार्यालयांसाठी अप्पर हवेली कार्यालय अस्तित्वात आले आहे. त्यामुळे तहसिल कार्यालयाचे विभाजन होऊन नागरीकांची कामे वेळेत होतील व नागरीकांना सोईच्या दृष्टीने अस्थापणा सुरु होईल असे शासनाचे मुख्य उदिष्ठ होते. त्यासाठी लोणीकाळभोर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे४ एकर क्षेत्र शासकीय इमारतींसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला आहे.त्यानुसार महसूल विभागाने जागा ताब्यात घेऊन अप्पर लोणीकाळभोर कार्यालयाची इमारत पूर्ण केली आहे.
परंतु कार्यालय पूर्ण होऊनही कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी अप्पर लोणीकाळभोर कार्यालय हे मूहूर्त अथवा इच्छाशक्तीचा दाखवित नसल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना खुंटीवर टांगून पडल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी सूचना देऊन अनेक शासकीय मुहूर्त गेले. परंतु अद्याप हे कार्यालय लोणीकाळभोर येथे येऊ शकले नाही. खडकमाळ येथील हवेली तहसिलच्या मुख्य कार्यालयात गेली दिड वर्षे हे कार्यालय सुरू अडगळीत आहे. या मुख्य कार्यालयात निवासी तहसिलदार, महसूल नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, पुरवठा कार्यालयासह अन्य अस्थापणा असल्याने याच कार्यालयाची जागा कमी पडत असताना अप्पर महसूलच्या स्वंतत्र कार्यालयाने अडचणी भर घातली आहे.कर्मचारी जागा कमी पडून या ठिकाणी काम करीत आहे. मात्र तरीही लोणीकाळभोर अप्पर कार्यालयाचे हस्तांतरण का होत नाही असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची नव्हे तर महसूलमंत्र्यांचा आदेशाची हे कार्यालय वाट पाहत आहे काय ? असा प्रश्न पडला आहे.
“अप्पर लोणीकाळभोर तहसील कार्यालय लोणीकाळभोर येथे स्थलांतरीत करण्याची कार्यवाही का थांबली आहे या संदर्भात माहिती घेण्यात येईल, कार्यालयाचे काम पूर्ण झाले असेल तर तातडीने कार्यालय स्थलांतरीत करण्याची कार्यवाही होईल”
जितेंद्र डुडी – जिल्हाधिकारी, पुणे